आरोग्यासाठी नियम: Health Tips
१. या देहरुपी देवालयाचे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असे तीन महत्वाचे आधारस्तंभ आहेत.
२. आहार शक्यतो सात्विक, हलका व पाचक असावा, मसालायुक्त तळलेले पदार्थ,अति तिखट यांचे सेवन टाळावे.
३.जेवताना पाणी कमी प्या आणि जेवल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी पिऊ शकता. दात मिटून पाण्याची चव घेत पाणी प्यायलेले चांगले.
४. कमी खावे, खूप चावावे म्हणजे शिळी भाकरीपण पचत असते. पोटाचे दोन भाग अन्नासाठी, एक भाग पाण्यासाठी व एक भाग हवेसाठी असावा.
५. रात्रीचा आहार अल्पच घ्यावा. रात्री १० च्या पुढे जागू नये व सकाळी ५ च्या पुढे झोपू नये. आरोग्यासाठी ७ तासांची झोप पुरे आहे.
६. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपता कामा नये. साधारण एक तासाच्या अंतराने झोपावे. रात्री आंबट पदार्थ सेवन वर्ज्य समजावे.
७. झोपताना शक्यतो डाव्या कुशीवर झोपले पाहिजे. त्यामुळे सूर्य नाडीचा प्रवाह चालू राहून रात्रीचे अन्न पचण्यास मदत होते. पण अधूनमधून डाव्या कुशीवरून उजव्या कुशीवर झोपण्यास हरकत नाही.
८. झोपण्याआधी थंड पाण्याने हात, पाय, तोंड धुऊन व 'नेत्र स्नान' घेऊन झोपावे. झोप शांत लागेल. स्वप्नदोष टळतील.
९. पालथे झोपण्याची सवय असता कामा नये. पालथे झोपल्याने नाना प्रकारची बरी वाईट अशी स्वप्ने पडतात. कधी स्वप्नदोष वाढतात. श्वासनलिका बंद होऊन तोंड उघडण्याची पाळी येते व आरोग्य बिघडते.
१0. कारणाशिवाय दिवसा झोप घेणे म्हणजे आळसास एक प्रकारे आमंत्रण देणेच होय. दिवसाच्या जेवणानंतर अर्धा तास वामकुक्षी करू शकता, परंतु झोपून मात्र जाऊ नये.
११. जेवताना विचार चांगले असावेत, मग ती चटणी-भाकरी असली तरी चालेल, कारण ज्या विचारांनी अन्न खावे त्याप्रमाणे मन तयार होत असते.
१२. अन्न खाताना चांगल्या विचारांचा प्रभाव चांगला रस बनविण्यात व तसे रक्त तयार होण्यात होतो. (जसे खावे अन्न। तसे होते मन). नाम घेता ग्रासोग्रासी। नित्य जेविला उपाशी ।। असेच संतांचे बोल आहेत.
१३. जगण्यासाठी खावयाचे आहे, खाण्यासाठी जगायचे नाही. हा सिद्धांत घेऊन आहारात दक्षता घ्यावी. तामसी आहाराने शरीरातील रक्त गरम होऊन पातळ बनते व मनुष्य क्रोधी बनत जातो.
१४. क्रोधाने आणि भोगाने शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तिचाही हास होतो. श्वासांची गती जलद होऊन चित्ताची चंचलता वाढते व आयुरारोग्य धोक्यात येते.
१५. आहार-विहार, आचार-विचार हे संपूर्ण आयुरारोग्याचे खतपाणी आहे.आरोग्यही राखले जाते व मनही पवित्र होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा