डेंग्यू विषयी माहिती...






प्रस्तावना:- समाजामध्ये अनेक आजाराच्या समस्या आहेत. त्यापैकीच एक असलेली समस्या म्हणजे डेंग्यू होय. आपला समाज अनेक वर्षापासून या आजारांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण तरीही दरवर्षी अनेक जन या आजारांना बळी पडत आहेत. याचे कारण आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून आपल्या घरात आणि परिसरात डेंग्यू आजार प्रसार करणारे डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेतली तर डेंग्यू रुग्णाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे सहज शक्य आहे. 

डेंग्यू  आजाराविषयी -

डेंग्यू ताप हा आजार डेंग्यू विषाणूमुळे ( अर्बोव्हायरस ) होणारा विषाणूजन्य आजार आहे. डेंग्यूच्या विषाणूचे चार प्रकार डेंग्यू-1,डेंग्यू-2,डेंग्यू-3,डेंग्यू- 4 असे आहेत. डेंग्यू तापाचा प्रसार रुग्ण व्यक्ती पासून निरोगी व्यक्तीला 'एडिस इजिप्ती'  डासाच्या चावण्याने होतो. 

डेंग्यू विषाणूची वाढ डासांमध्ये साधारणपणे आठ ते दहा दिवसात पूर्ण होते. हा विषाणू युक्त डास मरेपर्यंत  दूषित राहून अनेक व्यक्तींना डेंगीचा प्रसार करू शकतो. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात म्हणून त्यांना 'टायगर  मॉस्क्युटो' असेही म्हणतात. डेंग्यू आजार पसरविणारे डास सहसा दिवसा चावतात.

 या डासाची उत्पत्ती खालील ठिकाणी होत असते -

साठवलेल्या स्वच्छ पाणी साठ्यात या डासाची उत्पत्ती होते. रांजण, डेरा,पाण्याची टाकी, बॅलर, हौद, इत्यादी तसेच नारळाच्या करवंट्या, टायर, फुटके डब्बे, कुंड्या, बाटल्या, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे, फ्रिजचा ड्रीपपॅन, इत्यादी ठिकाणी होते. 

डेंग्यू तापाचा अधिशयन काळ:-

 या रोगाचा अधिशयन काळ तीन ते दहा दिवस आहे.

 अ) डेंग्यू ताप:- 

क्षणे:-1.एकाएकी तीव्रताप येतो. 2.तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी होते. 3.उलट्या होतात. 4.दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोळेदुखी होते. 5.अशक्तपणा येतो भूक मंदावते. 6.जास्त तहान लागते व तोंडाला कोरड पडते. 7.ताप कमी जास्त होतो. 8.अंगावर पुरळ येते.

 ब) रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप:-

लक्षणे :- 1) डेंग्यू तापाची वरील प्रमाणे लक्षणे आढळून येतात. 2) रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप बहुतांशी पंधरा वर्षाखालील मुलांना होतो तसेच मोठ्या व्यक्तींना देखील होऊ शकतो. 3) त्वचेखाली रक्तस्त्राव होतो. 4) नाकातून रक्तस्त्राव होतो. 5) रक्ताची उलटी होते. 6) रक्त मिश्रित किंवा काळसर रंगाची शौचाला होणे पोट दुखणे. 7) रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो या गंभीर बेशुद्ध अवस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात.

डेंग्यू तापाचे निदान कसे करावे -

डेंग्यू तापाच्या निदानासाठी रक्तजल नमुने प्रयोगशाळेत पाठवणे आवश्यक असते. रक्तजल नमुन्यासाठी रुग्णाचे पाच ते सहा मि. ली. रक्त शिरेतून काढून त्याचा रक्तजल नमुना शीतसाखळी माध्यमातून 48 तासाच्या आत राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे तपासणी करिता पाठवावा लागतो. याचे निष्कर्ष प्राप्त होण्यास काही कालावधी लागत असल्याने उद्रेकाच्या ठिकाणी सध्या उपलब्ध असलेल्या डेंगी रॅपिड डायग्नोस्टिक  किटस् द्वारे रुग्णाच्या रक्ताची तपासणी करावी.

 उपचार- 

डेंग्यू तापावर निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. मात्र लक्षणाद्वारे उपचार व चिकित्सा करणे रुग्णाचे आरोग्य रक्षणासाठी आवश्यक आहे. यामध्ये ताप असताना संपूर्ण विश्रांती घ्यावी. पॅरासिटॅमॉल वयोमानानुसार योग्य मात्रेत घ्यावीत. रुग्णाचे तापमान वाढल्यास अंग पाण्याने पुसून घ्यावे. मात्र रुग्णाला गंभीर लक्षणे दिसत असल्यास तात्काळ रुग्णालयात दाखवून डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. 

डेंग्यू डासाचे जीवन चक्र- 

डेंग्यू पासून स्वतःला आणि आपल्या गावाला वाचवायचे असेल तर या डासाच्या जीवन चक्राचा भेद आपल्याला करायला हवा. डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला आणि आपल्या घरात आणि परिसरात डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली तर हे साध्य होऊ शकते.

आपल्याला डेंग्यू होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना:-

1) डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी पाणी साठविण्याची भांडी घट्ट झाकून ठेवा. 2) घराच्या अवतीभवती असलेले टायर, बाटल्या व प्लास्टिक डबे नष्ट करावे यामध्ये पाणीसाठा होऊ देऊ नका. 3) घरात झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, 4) डासांना पळवून लावणाऱ्या अगरबत्तीचा वापर करावा. 5) घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवा. 6) सांडपाण्याची विल्हेवाट शोषखड्यातून लावा. परसबाग फुलवा. 7) पाण्याची डबकी बुजवा किंवा ती वाहती करा. 8) घराच्या खिडक्यांना मच्छर जाळ्या बसवा. 9) मोठ्या पाणीसाठ्‌यामध्ये गप्पी मासे सोडा. 10) शौचालयाच्या व्हेंट पाईपला वरच्या बाजूला जाळी बसून घ्या. 

वरील सर्व उपाय योजनांचा अवलंब केल्यास डासामार्फत प्रसार होणारे डेंग्यू,हिवताप,चिकुनगुन्या,झिकाजपानी मेंदूज्वरहत्तीरोग या आजारापासू आपण मुक्त होऊ व आपल्या भावी पिढ्यांना आरोग्यदायी जीवनाचा अमूल्य ठेवा देऊ.

watch for video :- https://linktw.in/Od4flr



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

31 May जागतिक तंबाखू विरोधी दिन

World Malaria Day जागतिक हिवताप दिन - 25 एप्रिल 2024